दिवाळी विशेष : बाजारात रेडिमेड फराळाचा सुगंध दरवळला, रेडिमेड फराळ घेण्यावर भर; चिवडा, शेव, लाडू खरेदीची लगबग सुरू

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या सणाची सर्वत्र तयारी सुरू आहे. बाजारात खरेदीची धूम आहे. उद्या लक्ष्मीपूजन असल्याने सर्वत्र खरेदीवर भर दिला जात आहे. त्यातल्या त्यात बाजारपेठेत रेडिमेड फराळाचा खमंग दरवळला आहे. दिवाळीच्या निमित्ताने रेडिमेड फराळ खरेदीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. चिवडा, लाडू, शेव, चकली सह आदी फराळ खरेदीची लगबग सुरू आहे. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही खरेदी होत असल्याची माहिती भावे कंपनी सिडको शाखेचे जयदीप भावे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.

दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र धामधूम सुरू आहे. बाजारात देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यंदा रेडिमेड फराळाची मागणी मागील वर्षी प्रमाणेच आहे.  दिवाळीचा सण अवघ्या एकच दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील बाजारपेठेत मोठी लगबग सुरू आहे. यंदा महागाई आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे घरी फराळ बनवण्याऐवजी रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे नोकरदार महिला आणि तरुण पिढीचा कल आहे. यामुळे शहरातील बचत गट आणि घरगुती स्तरावर फराळ बनवणाऱ्या महिलांच्या व्यवसायाला तसेच व्यवसायिक कंपनीना मोठी चालना मिळाली आहे.

रेडिमेड फराळाला मागणी कायम

नोकरदार महिलांची वाढती संख्या आणि शहरात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने त्यांना दिवाळीच्या काळात फराळ बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी त्या तयार फराळाला प्राधान्य देत आहेत. त्यात महागाईचाही फटका बसत आहे. फराळासाठी लागणारे तेल, तूप, रवा, बेसन, साखर आणि मसाल्याचे दर वाढल्यामुळे घरी फराळ बनवण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रेडिमेड फराळ विकत घेणे काही अंशी परवडणारे ठरत आहे. त्यामुळे शहरातील बचत गट आणि नामांकित गृहोद्योगांकडून घरगुती पद्धतीने, शुद्ध तुपात आणि चांगल्या प्रतीचे पदार्थ तयार केले जात असल्याने ग्राहकांचा विश्‍वास वाढला आहे. त्यामुळे रेडिमेड फराळ खरेदीवर सध्या भर दिला जात आहे. घरगुती पद्धतीमुळे त्यांच्या चकली, करंजी आणि अनारशांना शहरातून चांगली मागणी मिळत आहे.

असे आहे फराळाचे दर

रेडिमेड फराळाचे दर मागील वर्षी प्रमाणेच आहेत. त्यात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही त्यामुळे ग्राहकांना आहे त्याच दरात रेडिमेड फराळ मिळणार आहे. रेडिमेड फराळ सध्या मोठ्या प्रमाणात बनविण्यावर भर दिला गेला आहे. लक्ष्मीपूजनला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्यात चिवडा, फरसाण जवळपास वीस प्रकारचे विक्री केले जात आहेत. त्यात प्रति किलो चिवडा 260 ते 300 रुपये विक्री केला जात आहेत. मोतीचुरचे तेलातले लाडू 360 रुपये प्रति किलो, गावरान तुपातले लाडू 600 रुपये प्रति किलो, रवा लाडू 320 प्रति किलो, बेसन लाडू 320 रुपये प्रति किलो, चकली 340 रुपये, भाजके पोहे आणि पातळ पोहे 260 ते 320 रुपये प्रति किलो दरात विक्री केले जात आहेत. तसेच करंजी 380 रुपये, अनारसे 480 रुपये, शंकरपाळे 280 प्रति किलो विक्री केले जात आहेत.